महाभारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अमर व्यक्तिरेखा असूनही अश्वत्थाम्याच्या वाट्याला
सदैव उपेक्षाच आली. अश्वत्थाम्याला मिळालेले अमरत्व हे वरदान नसून, एक 'शाप' म्हणून
मिळाले आहे. महाभारतात अश्वत्थाम्याच्या हातून असे कोणते दोन अक्षम्य अपराध घडले, ज्यामुळे
कृष्णाने त्याला हजारो वर्षे पृथ्वीवर एकाकी आणि दयनीय अवस्थेत भटकत राहण्याचा अभिशाप
दिला? अश्वत्थाम्याच्या मनात आजही हा प्रश्न रेंगाळतो आहे की, एवढा कठोर शाप देऊन
कृष्णाने खरंच आपल्यावर अन्याय केला की त्यामागे भगवान श्रीकृष्णाची काही दैवी योजना
होती? अश्वत्थाम्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाला आधुनिक युगातील समाजाला काही
संदेश तर द्यायचा नाहीये ना? बहुतेक सगळे लोक अश्वत्थाम्याला दुर्योधनाप्रमाणेच कपटी आणि
दुर्वर्तनी समजतात. लेखकाने या पुस्तकात अश्वत्थाम्याच्या जीवनातील काही अज्ञात पैलूंवर
प्रकाश टाकला असून, त्या महान योद्ध्याच्या दृष्टिकोनातून महाभारताच्या कथेला एका नव्या
स्वरूपात मांडले आहे.